न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. २२ नोव्हें) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने उद्या शुक्रवार (दि.२३ नोव्हें) रोजी पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात आदिवासी सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय (२३ ते २५ नोव्हेंबर) महोत्सवा दरम्यान आदिवासी नृत्य, गौरी नाच, संभळ नृत्य, मोखाडा, तारपा नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्याचबरोबर खवय्यांना आदिवासी पदार्थ खाण्याची हौस भागविता येणार आहे. खेकडा, रानभाज्या, हुलग्याची शिंगोडी खवय्यांसाठी ही खास मेजवाणी असणार आहे, अशी माहिती जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे यांनी सांगितली आहे.
या महोत्सवाचे शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी सहा वाजता भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उषा मुंढे म्हणाल्या की, आदिवासी सांस्कृतिक आणि खाद्य या तीन दिवसीय महोत्सवात आदिवासींच्या चालिरिती, रुढी, परंपरांचा जागर केला जाणार आहे. रात्री दहा वाजेपर्यंत महोत्सवातील कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात राज्यभरातील आदिवासी नागरिक सहभागी होणार आहेत. दररोज सायंकाळी सहानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. त्यामध्ये आदिवासींचे गोंडी, भलर, मोखाडा, तारपा, संभळ नृत्य, तूरनाच, गौरी नृत्य सादर केले जाणार आहे. महिलांची लेझीम पथक, शाहिरी जलसाचे देखील कार्यक्रम होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन नगरसेविका उषा मुंढे यांनी केले आहे.