न्युज पीसीएमसी नेटवर्क
धनकवडी / पिंपरी (दि. २७ नोव्हें) :- भारतीय संविधान राष्ट्रविकास अभियान व अशोक सर्वांगिण विकास सोसायटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांना २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त ’संविधान कन्या’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुप्रिया सुळे यांनी संविधान सन्मान अभियान सुरु करुन पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी संविधान स्तंभ उभे करण्याचा संकल्प केलेला असून त्याची सुरुवात बारामतीत पहिला संविधान स्तंभ उभा करुन केली आहे. त्या एकूण ९ संविधान स्तंभ उभे करणार आहेत. त्यापैकी ७ संविधान स्तंभ उभे करण्यात आले असून, हे सर्व स्तंभ अवघ्या ६ महिन्यात यशस्वीपणे उभे केले आहेत. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे आणि ‘आपले संविधान आपला अभिमान’ या घोषवाक्याने सुरुवात केली आहे.
त्याचप्रमाणे दि. २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त पुणे धनकवडी येथील आदरणीय शरदचंद्रजी पवार बहुउद्देशिय भवनाच्या प्रागंणात संविधान स्तंभाचे उद्घाटन आदरणीय लोकनेते शरद पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व बाबी लक्षात घेता संविधान प्रचार आणि प्रसार करण्याचे ध्येय सुप्रिया सुळे करीत असल्याने त्यांना संस्थेच्यावतीने ’संविधान कन्या’ या पुरस्काराने डॉ. अशोक शिलवंत, विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे आणि पिं. चिं. मनपा नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
भारतीय संविधान राष्ट्रविकास अभियान व अशोक सर्वांगिण विकास सोसायटी पुणे या संस्थांच्या माध्यमातून भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात चालू असल्याने आणि नुकतेच त्यांनी ’भारतीय संविधान प्रबोधन महारॅली’ सोलापूर ते चैत्यभूमी दादर अशी काढून संविधानाचे प्रबोधन केले. त्याबद्दल डॉ. अशोक शिलवंत व विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे यांचा आदरणीय शरद पवार यांचे हस्ते ’संविधान सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे यांनाही गौरविण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे यांनी पवार साहेबांना विनंती केली की, या देशातील अज्ञान दूर करावयाचे असेल व देशाला महासत्ता बनवायचे असेल तर, संविधानाची काटेकोर अमंलबजावणी झाली पाहिजे व राष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अर्थात के. जी. ते पी. जी. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये संविधानाचा अंतर्भाव झाला पाहिजे आणि आपले नेतृत्त्वात हे शक्य आहे, असा लोकांमध्ये जनमानस आहे, असे उद्गार काढले.
सदरच्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, खा. वंदना चव्हाण, आ. जयदेवराव गायकवाड, चेतन तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष नाना देवकाते, पुणे मनपाचे माजी महापौर दत्ता धनकवडे, पुणे जिल्हा अध्यक्षा महिला विभागाच्या रुपाली चाकणकर, कराडचे माजी नगरसेवक आनंदराव लादे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कविता खराडे, मिनाक्षी उंबरकर तसेच आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक यांची विशेष उपस्थिती होती.
संविधान स्तंभाच्या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. खा. सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर प्रविण शिंदे यांनी आभार मानले.










