न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रु.) :- गेल्या १५२ दिवसांपासुन दाई-ईची करकारिया लि. कंपनीमधील कामगारांचा कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ चक्रीय उपोषण व आंदोलन चालु आहे. या कंपनीच्या विरोधात न्यायालयाने तोडगा काढण्याच्या सुचना देऊन देखील कंपनीने न्यायालयाच्या सुचनेला केराची टोपली दाखवलेली आहे. दाई-ईची करकारिया लि. मधील अन्यायग्रस्त कामगारांनी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांची भेट घेतली व या प्रश्नी लक्ष घालुन मदत करण्याची त्यांना विनंती केली होती.
या कंपनीने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, कामगारांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तोडगा न काढता कंपनीमधील मटेरियल शिफ्टिंगचे काम चालु केले आहे. यावेळी युवराज दाखले यांनी दाई-ईची करकारिया लि कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राजेश मुळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे तात्काळ संपर्क करून, तोडगा काढण्याची विनंती केली व आंदोलनकर्त्या कामगारांची दखल घेतली नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलनचा छेडण्याचा इशारा दिला होता.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, मारूती मस्के, बाळासाहेब गायकवाड, दिपक कांबळे, आशिष वाळके, सतिष भवाळ आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
याची दखल घेत कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राजेश मुळे यांनी दोन ते चार दिवसांमध्ये मी स्वतः वरिष्ठांशी चर्चा करतो व सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले. दरम्यान शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या तात्काळ घेतलेल्या भूमिकेवर कामगार वर्गाच्या चेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले आहे, असे दाखले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.