न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रु.) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्या वतीने पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी मनोरंजनाच्या थव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील रहिवाश्यांसाठी नृत्य आणि हिंदी-मराठी सुमधुर गीतांसोबतच सात मजली हस्याच्या खास मेजवानीचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी लोकप्रियतेच्या शिखरावर असणार्या व साता समुद्रापार जाऊन पोहोचलेल्या, मराठी प्रेक्षकांसह हिंदी भाषिक प्रेक्षकांना खळखळून हसविणारा झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध शो ”चला हवा येऊ द्या” हा कार्यक्रम उद्या रविवार (दि. २४) रोजी सायंकाळी ६.०० वाजता, सांगवीतील पी. डब्ल्यू .डी मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे व टीमच्या अफलातून विनोदाने हास्याचे कारंजे उडवणार आहेत.
यासोबतच प्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड व त्यासोबतच आदी गायकांचा हिंदी-मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रमही संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून, कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नगरसेवक मयूर कलाटे यांनी केले आहे.











