न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री म्हणजेच गणपती. अखंड महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक वैभवाची देणगी देणारे हे दैवत. सार्वजनिकरित्या व घरोघरी एकदंताचे पूजन होते. मोठ्या आनंदाने व भक्तीपूवर्क वातारणात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.
विसर्जनाची वेळ येते तेव्हा लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप देताना डोळे पाणवतात आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा आमचा हक्काचा, प्रेमाचा आग्रह सुरु होतो, पण गणेश विसर्जनाने केवळ मनालाच नाही तर पर्यावरणालाही दुःख होते.

गणेशमूर्ती घडवण्याकरिता प्लास्टर ऑफ पॅरिसचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सभोवतालच्या परिसरातील विविध जलस्थाने म्हणजेच विहीरी, तलाव, नदी किंवा समुद्र यात विसर्जित केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे, जलजीवनाचे कधीही भरून न येणारे नुकसान होते.
दरवर्षी वाद होतात, टीका होतात, चर्चा होतात आणि कालांतराने विषय मागे पडतो. पर्यावरणाचे नुकसान मात्र थांबत नाही. यावर उपाय काय?
या गंभीर समस्यांवर आपल्या परीने, आपल्या पातळीवर एक रामबाण उपाय शोधलाय तो चिंचवड येथील श्री शंकर महाराज सेवा मंडळाने. रक्तदान शिबीराच्या माध्यमातून सेवाभावी वृत्ती जपत या संस्थेने आजपर्यंत हजारो रुग्णांना जीवदान दिले आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक पाउल पुढे येवून श्री शंकर महाराज सेवा मंडळ दरवर्षी शाडूच्या, नैसर्गिक रंगात रंगवलेल्या, पर्यावरणप्रेमी गणेशमूर्तीचे सार्वजनिक वितरण करते. यातील खरी गंमत वेगळीच आहे या मूर्तीचे विक्री मूल्यं हे संस्था ठरवत नाही तर खरेदी मूल्य ही गणेश मूर्ती विकत घेणारे गणेशभक्त ठरवतात.
पेण येथे या मूर्ती घडवल्या जातात. संस्था विविध आकाराच्या आणि लोकप्रिय मुद्रांमधील गणेश मूर्ती बनवून घेते. याकरिता गुजरात येथून शाडूची माती मागविली जाते. नैसर्गिक रंगात म्हणजेच हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, गेरू यात रंगवून वितरणासाठी पुण्याजवळील चिंचवडगावातील मोरया प्रसाद हॉल येथे भाविकांकरिता उपलब्ध केल्या जातात.
”मूर्ती आमची, किंमत तुमची” हे संस्थेचे घोषवाक्य आहे. प्रत्येक मूर्तीसमोर त्या मूर्तीचे निर्मिती मूल्य लिहिलेले असते. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागून स्वतःला जे मूल्य योग्य वाटेल अथवा परवडेल तेवढेच मूल्य द्यायचे आणि मूर्ती घरी घेऊन जायची.
मूर्तीचे मूल्य देण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीसारखी गुप्तदान पद्धत अवलंबविली जाते. एका खोलीत तात्पुरते मंदिर उभारले जाते. तिथे दानपेटी आणि रिकामे पाकीट असते. भाविकाने एकटेच त्या खोलीत जाऊन योग्य वाटेल ती रक्कम पाकिटात घालून ते दानपेटीत टाकावे. त्यामुळे कुठल्या भविकाने किती रक्कम दानपेटीत टाकली ते कुणालाच कळत नाही.
पर्यावरण रक्षण व्हावे याकरिता नैसर्गिक पद्धती वापरून या गणेशमूर्ती घडवण्यात येतात. त्यामुळे मूर्ती विसर्जन घरातल्या घरातही केले तरी चालण्यासारखे आहे. घरातील बादलीत किंवा हौदात नेटकेपणाने विसर्जन करत येते.
या उपक्रमातून एका वेळी अनेक हेतू सध्या होतात, पर्यावरणाचे रक्षण होते, वृद्धांना सर्वप्रकारचा आधार आणि सेवा मिळते, गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळते. लंबोदर विनायकाची याशिवाय उचित सेवा आणखी काय असू शकते. त्यामुळे आपणही या उपक्रमात सहभागी होऊन श्रींच्या मूर्तीची निवड करून योग्य ते मूल्य देऊन भरभरून दान करून या सामाजिक उपकक्रमात सहभागी व्हावे.
गणेशमूर्ती खरेदी करीता चिंचवडगाव येथील श्री शंकर महाराज सेवा मंडळ, अमित कॉम्प्लेक्स, चाफेकर चौक या संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन अविनाश वैद्य – ९८२२३७६७०४, प्रशांत ताम्हणकर – ९९७५९००९४३, आशा पात्रुडकर – ९४०४८३०१६०, शामकांत शहा – ९७६५६९६६२२, मुकुंद नाईक – ९८३४७४५५३८, विक्रम प्रभुणे या संयोजकांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना केले.
या अभिनव उपक्रमातून मिळणारा निधी हि संस्था अतिशय कौतुकास्पद उपक्रमासाठी खर्च करते. संस्था या माध्यमातून अनाथांकरिता ”स्नेह सावली, आपलं घर” हा वृद्धाश्रम चालवते. जिथे वृद्धांचा संपूर्ण निवासखर्च संस्थेमार्फत केला जातो. संस्थेने स्वतः चालवलेल्या या वृद्धाश्रमातील या वृद्धांना अतिशय खर्चीक वैद्यकीय उपचारांची गरज आहे. त्यांच्या उपचारांवर देखील हा निधी खर्च केला जातो. संस्थेमार्फत केलेल्या खर्चाचा सविस्तर ताळेबंदही ठेवला जातो. संस्थेमार्फत आतापर्यत अनेक वृद्धांना अतिशय क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण आदी उपचारांकरिता मदत करण्यात आली आहे. याशिवाय अनेक गरीब परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदतही केली आहे.










