- पावणेचार कोटी खर्चून आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा खाऊगल्लीचा अट्टाहास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील मोकळ्या जागेमध्ये खाऊगल्ली उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पावणेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये याठिकाणी खाऊगल्ली उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणार असल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने इंदूर पॅटर्न राबवला जात आहे. त्यासाठी इंदूर शहरामध्ये ज्या पद्धतीने स्वच्छतेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत, त्याचीच कॉपी करून पिंपरी चिंचवड शहरामध्ये योजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. इंदूर शहरामध्ये ठिकठिकाणी खाऊगल्ली उभारलेली आहे. पालिका प्रशासनानेही त्याच धर्तीवर शहरामध्ये खाऊगल्ली उभारण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा महापालिका प्रशासन करत आहे.
निगडीमध्ये मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली महापालिकेच्या वतीने खाऊगल्ली सुरू करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांमध्येच ही खाऊगल्ली बंद करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली आहे. असे असताना आता आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये तब्बल चार कोटी रुपये खर्च करून खाऊगल्ली उभी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यात हे काम उरकण्यात येणार असल्याने खाऊगल्लीच्या कामावर शंका उपस्थित केली जात आहे.
आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये खाऊगल्ली बांधण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने निविदाप्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये सहा ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी मे. देव कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने २६.७७ टक्के कमी दर सादर केला. त्यानुसार तीन कोटी ७० लाख २३ हजार ६०३ रुपये खर्च करण्यात ‘येणार आहेत. या कामासाठी तीन महिन्यांची मुदत असणार आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.


















