न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी प्रतिनिधी :- प्रभाग क्रमांक २७, राहटणी – काळेवाडीतील तापकीरनगरमधून तापकिर चौकमार्गे तापकीर मळ्याकडे जाणारा ४० फुटी रोड विकसित करण्यात यावा अशी मागणी शिवसेना राहटणी – काळेवाडी विभागाचे प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांनी आयुक्तांकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात हा परिसर ‘ग प्रभाग’ अंतर्गत येत असून उपलब्ध रस्त्यावर वाहतुकीची तीव्र कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना वर्दळीचा सामना करावा लागतो. तसेच आझाद चौक, ज्योतीबा नगर या ठिकाणी वाहतुक प्रचंड विस्कळीत होते.
तसेच या मार्गावर क्लासेस, सायबर कॅफे व शाळा असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता पर्यायी परंतु दूरचा रस्ता वापरावा लागत आहे. तिथे जाण्याकरिता वळसा घेऊन जावे लागते. या परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणी स्वतः लक्ष घालून या परिसरात पर्यायी मार्ग तयार करण्याकरिता भूमी संपादन करावी व तापकिर मळा रोडलगत रस्ता तयार करून वाहतुकीचा प्रश्न सोडवावा असे युवराज दाखले यांनी निवेदनात नमूद केले आहे.