न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- महापालिकेच्या वतीने कर संकलन विभागाच्या अॅप्लिकेशनद्वारे मालमत्तेचे अक्षांश व रेखांशची माहिती घेतली जात आहे. प्रत्येक मालमत्तेचा फोटो घेतला जात असून, जिओ टॅग केले आहेत. मालमत्ता जिओ टॅग झाली असल्यामुळे संबंधित मालमत्ता शोधण्याचे काम एका क्लिकवर करण्यात येणार आहे.
अॅप्लिकेशनद्वारे मालमत्ताधारकांचा चुकीचा मोबाइल क्रमांक दुरुस्त करणे, नवीन मोबाइल क्रमांक अपडेट केले जात आहे. यापैकी आत्तापर्यंत पन्नास हजारांवर मोबाइल क्रमांक दुरुस्त केले असून, दहा हजार मालमत्तांचे पर्यायी मोबाइल क्रमांक आले आहेत. त्याचबरोबर बिलांवर मालमत्ताधारकांच्या जुन्या पत्त्यांमध्ये दुरुस्ती करण्यास महिलांना सांगितले आहे. त्यानुसार सत्तर हजार मालमत्ताधारकांच्या पत्त्यांमध्ये दुरुस्ती केली आहे, तर अनेक मालमत्ताधारक संबंधित मालमत्तेच्या ठिकाणी राहत नाहीत. त्यांचाही पर्यायी पत्ताही घेतला जात असून, दहा हजार मालमत्ताधारकांचे पर्यायी पत्ते घेऊन अपडेट केले आहेत. तीन हजारांवर मालमत्ता आढळून आल्या आहेत.
महापालिकेच्या कर संकलन व कर अकारणी विभागाच्या वतीने मालमत्ताधारकांना दरवर्षी बिले देण्यात येत असतात. मात्र, अपु-या पत्त्यांमुळे अनेक मालमत्ताधारकांना बिले मिळण्यास अडचण येत असते. तसेच कर संकलनच्या सर्व सेवा- सुविधा ऑनलाइन झाल्या असताना मोबाइल क्रमांक अपडेट नसल्याने ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत.
सिद्धी प्रकल्प हा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महिला सक्षमीकरण व कर संकलन विभागाच्या माहितीचे शुद्धीकरण अशी दोन महत्त्वाची उद्दिष्टे ठेवून हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. आजमितीस ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होताना दिसत आहेत. स्थानिक महिलांना बिले वाटपाचे काम दिले आहे. त्यांना शहराच्या स्थानिक भागाची सखोल माहिती होत आहे. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक…