न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- पूर्वी ज्येष्ठांमध्ये दम्याचा (अस्थमा) आजार आढळत होता. मात्र, आता तरुणांमध्येही हा आजार पाहण्यास मिळत आहे. डॉक्टरांकडे दम्याच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये सरासरी ५ ते २० टक्के प्रमाण तरुणांचे आढळत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. सध्याची बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, वाढलेले प्रमाण आणि व्यायामाचा अभाव या प्रमुख कारणांमुळे तरुणांमध्ये हा आजार बळावत आहे.
दमा हा आजार सर्वसामान्यपणे यापूर्वी ज्येष्ठांमध्ये आढळत होता. वाढत्या वयाबरोबरच हा आजार जडत जात असे. मात्र, सध्या परिस्थिती बदलत चालली आहे. आपली दिनचर्या आणि जीवनशैली बदलली आहे. वातावरणातील प्रदूषण वाढले आहे. नोकरी- व्यवसायानिमित्त तरुणांना प्रवास करावा लागतो. त्या दरम्यान त्यांना वायू प्रदूषणाला सामोरे जावे लागते. त्याशिवाय, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी बैठ्या स्वरुपाचे काम, नियमित व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष आणि फास्टफूडच्या आहारी जाणारी तरुणाई सध्या पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे कमी वयातच विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामध्ये दम्याचा आजारही येतो. व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांनी वेळीच लक्ष न दिल्यास त्यांना दम्यासारखा त्रास होण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
शून्य ते ५ या वयोगटातील बालकांमध्ये बाल दमा हा आजार आढळून येतो. ५ वयोगटानंतर जशीजशी मुले मोठी होऊ लागतात तसातसा हा आजार कमी होऊ लागतो. लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानावर पाठविण्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. त्यामुळे त्यांचा मातीशी संबंध येत नाही. पर्यायाने, त्यांना झालेले छोटे व्हायरल इन्फेक्शनदेखील त्यांच्यामध्ये दम्याचा आजार निर्माण करू शकतो.
अधिक काळ कोरडा खोकला, दम किंवा धाप लागणे, त्याचप्रमाणे आवाज येणे, छातीमध्ये दाटून येणे, रात्री झोपल्यावर छातीतून सुई सुई असा आवाज येणे ही दम्याची लक्षणं आहेत. या आजारावर दोन आठवड्यांपेक्षा अॅलर्जीला प्रतिबंध करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. घशातून खरखर आजारासाठी ब्रन्को डायलेटर (दम्याचे स्प्रे किंवा पंप) वापरण्यात येतात.
व्यायामाचा अभाव, फास्टफूडचे वाढलेले प्रमाण अशा विविध कारणांमुळे तरुणांमध्ये दम्याचा आजार आढळून येत आहे. त्याचे प्रमाण सरासरी ५ ते २० टक्के इतके आहे. दम्याची लक्षणे आढळल्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन तातडीने उपचार घ्यावे. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्याने प्राणायाम, चालणे, एरोबिक व्यायाम करावा.