न्यूज पीसीएमसी नेटवर्क
गोवा :- राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रीमंडळातून दोन मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले दोन्ही मंत्री हे भाजपा पक्षाचे आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे.
फ्रांन्सिस डिसूजा आणि पांडुरंग मडकईकर अशी दोन मंत्र्यांची नावे असून मागील काही काळापासून दोघेही आजारी आहेत आणि रूग्णालयात उपचार घेत आहेत. फ्रांन्सिस डिसूजा याच्यांकडे नगरविकास मंत्रीपद आणि पांडुरंग मडकईकर यांच्याकडे वीजमंत्रीपद होते.
मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकर हेच कायम राहतील असा निर्णय काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहिर केला होता. त्यानंतर आज मंत्रिमंडळातील दोन आजारी मंत्र्यांच्या रिक्त जागी दोन नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात आज दोन नव्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश होणार असून कुडचडेचे आमदार निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांचा आज संध्याकाळी राजभवानावर शपथविधी सोहळा होणार आहे. नाईक हे माजी वीजमंत्री होते तर निलेश काब्राल हे प्रथमच मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.