- भाजपा कायदा आघाडीचे शहराध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२४) :- कामाच्या ताणामुळे महसूल अधिकारी अपील व महसुली तक्रारींना न्याय देऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन, सेवानिवृत्त न्यायाधीश अथवा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व जिल्हा पातळीवर महसूल न्यायालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी भाजपा कायदा आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांनी केली आहे. खटले मार्गी लागू शकतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले. या मागणीचे निवेदन महसूलमंत्री व संबधित समिती पदाधिकाऱ्यांना आम्ही देणार आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
याबाबत अधिक माहिती देतान अॅड. झोळ म्हणाले की, महसूल विभागातील अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. त्यामुळे त्यांना जमीनविषयक दाव्यांच्या सुनावणीसाठी वेळ देता येत नसल्याने एक दिवसात मार्गी लागणाऱ्या अपिलासाठी या अधिकाऱ्यांकडून तीन-तीन महिने पुढची तारिख दिली जाते. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना वेळेत निकाल मिळत नसल्याने ते वैतागले आहेत. आता याला वाचा फोडण्याचे काम केले पाहिजे.
महसूल न्यायालयाबाबत अॅड. झोळ म्हणाले की, सद्यस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अदालतीचे आयोजन केले जाते. मात्र. महसूली दावे वेळेत निकाली काढून, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व जिल्हापातळीवर महसुल अदालतीचे आयोजन करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले
महसूल संहितेमध्ये बदल करावा, अशी आमची राज्य सरकारकडे जुनी मागणी आहे. आता राज्य सरकारने महसूल संहितेमध्ये बदल करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तालुका व जिल्हापातळीवर महसूल न्यायालय स्थापन करण्यात यावे जेणेकरुन सर्वसामान्यांना न्याय मिळू शकेल, असे अॅड. झोळ यांनी सांगितले.

















