न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२४) :- कुदळवाडी परिसरात एका कंपनीला शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीतील लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कुदळवाडीतील एच.आय. पॉलिमर्स या २,५०० चौरस फूट जागेतील कंपनीत भंगारातून विलग केलेले प्लास्टिक रिसायकल करून पुन्हा वापरत आणले जात होते. मात्र, कंपनीत आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती कंपनीचे मालक कमरूद्दीन रहिमानी यांनी दिली.
महापालिकेचा अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. अग्निशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, मुख्य अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी कामगिरी बजावली.
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. अग्निशमन विभागाच्या पिंपरी, मोशी, तळवडे, भोसरी व चिखली केंद्राकडून नऊ बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली गेली.

















