न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाची दुचाकी वाहनांची नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा वाहन मालकांनी २० फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अर्ज सादर करावा.
अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेला मोबाइल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘डी.वाय.आर.टी.ओ., पिंपरी-चिंचवड’ यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचा असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयकाची प्रत सादर करावी.
अनेकजण वाहनांचे नंबर ज्योतिषाला विचारून घेतात, तर अनेकजण लकी नंबर म्हणून हाच नंबर मिळावा अशी मागणी आरटीओ विभागाकडे करतात. यामध्ये प्रामुख्याने १, ७, ९ आणि १२ या क्रमांकास ज्या नंबरची बेरीज तो अंक येतो यासाठी अनेकजण आग्रही असतात.