- धुराचे लोळ पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भितीची वातावरण..
- आगीत झाडं होरपळून खाक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२४) :- मोरवाडीतील जुन्या कोर्टाच्या पाठीमागील आवारात रबराच्या गोदामाला भीषण आग लागली. त्यामुळे अमृतेश्वर सोसायटीजवळ रबर, प्लॅस्टिक, भंगार माल गोळा करून साठवलेले मोठे ढीग पेटले आहेत. चोरीचे टायर, केबलचा बेकायदा साठा या ठिकाणी असून त्याला आग लागली आहे.
ऑईल भरलेले बॅरल पेटल्याने त्याचा मोठा स्फोट होत असून परिसर धुराने काळवंडला आहे. तसेच मोठ्या उंचावर हे धुराचे लोळ पसरले असून पिंपरी, चिंचवडमधून देखील हे धुराचे लोळ दिसत आहेत.
परिसरातील नागरिकांमध्ये भितीची वातावरण आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
ही घटना आज बुधवारी (दि. २१) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. या धुरामुळे अमृतेश्वर कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजमेरा कॉलनी, तसेच मोरवाडी, एम्पायर स्क्वेअर आणि ऑटो क्लस्टर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.कोणतीही जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती नाही.