न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२४) :- फुस लावुन पळवुन नेलेल्या अल्पवयीन मुलीची हिमाचल प्रदेशमधुन सुटका करीत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जाधववाडी चिखली येथे राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमीष दाखवुन फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतुन त्यांच्या संमती शिवाय (दि. २६/०१/२०२४) रोजी सकाळी ०६:०० वा. ते १०.३० च्या सुमारास पळवून नेले होते. याबाबत चिखली पोलीस स्टेशन गु.रजि.नंबर ४१/२०२४, भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
संवेदनशिल प्रकरण असल्याने व.पो. नि. काटकर याच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक उद्धव खाडे व पोलीस अंमलदार यांची एक स्वतंत्र टिम तयार करुन तपास सुरु करण्यात आला. सदरच्या पथकाने जाधववाडी, चिखली परीसरातील सर्व सिसिटिव्ही कॅमे-याची तपासणी केली असता त्यांना सदरची मुलगी एका अज्ञात इसमासोबत जात असल्याचे त्यांना दिसुन आले. त्या ईसमाचा फ़ोटो विकसीत करुन चिखली परीसरात प्रसारीत केला असता सदरचा इसम हा सुरोज रेजाउल शेख (वय २१ वर्षे) हा कुदळवाडी परीसरात चिकन सेंटरवर काम करणारा मुलगा असल्याची माहिती त्यांना मिळाली.
प्राथमिक तपासात सदरचा मुलगा हा मुर्शिदाबाद, पश्चीम बंगाल येथील मुळ रहिवाशी असल्याची माहिती मिळाल्याने प्रथमता तपास पथकाने त्यांचे मुळ गावी त्यांचे आई वडील याचा शोध घेवुन तेथे तपास केला असता तो तेथेही गेलेला नसल्याची माहिती मिळत होती. आरोपी सुरोज याचा मोबाईल फ़ोन बंद असल्याने त्याचे लोकेशन मिळत नव्हते. त्याच्या संपर्कातील व्यक्तीबाबत माहिती घेता शोईल शेख, हैद्राबाद यांचे तो संपर्कात असल्याचे सिडीआर वरुन दिसुन येत होते. तसेच तो नियमितपणे रुपसिंग ठाकुर या नेपाळी मुलाचे संपर्कात असल्याचे दिसुन आले. रुपसिंग ठाकुर याचे मोबाईलचे तांत्रीक विष्लेषण केले असता तो चंदिगड ते सिमला, हिमाचल दरम्यानच्या पुर्व बाजुकडील गावामध्ये वावरत असल्याची जुजबी माहिती तांत्रीक तपासात समोर येत होती.
तात्काळ वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी सपोनि/खाडे, पो. ह. १८५१ अमर कांबळे व पो.ना. १८१३ सुरज सुतार असे पथक हिमाचल प्रदेश या ठिकाणी पाठविले. त्यानी दोन दिवस चंडीगड ते सिमला हिमाचल प्रदेश दरम्यानच्या पूर्व बाजुस असणा-या पहाडी भागातील खेडेगावामध्ये शोध घेत असताना त्याना भोजनगर, ता. परवानु, जिल्हा सोलन राज्य हिमाचल प्रदेश या ठिकाणी एका ठेकेदाराकडे आरोपी सुरज हा मजुरीची काम करत असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने कौशल्यपुर्वक त्यास ताब्यात घेवुन त्याने फ़ुस लावुन पळवुन नेलेल्या मुलीसही त्याच्या ताब्यातुन मुक्त केले. अश्या प्रकाराने अत्यल्प पिडीत मुलीची सुटका हिमाचल प्रदेशासारख्या पहाडी भागात जावुन करण्यात चिखली पोलीस स्टेशनच्या पोलीसांना यश आलेले आहे.
सदरची कामगिरी शिवाजी पवार पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड, संजय गौर सहा.पोलीस आयुक्त भोसरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली सपोनि उध्दव खाडे, पोना/अमर कांबळे, पोना/सुरज सुतार, पोना/ कबीर पिंजारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.











