न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना विमा पॉलिसी लागू करुन त्यांच्या जिवावर उठू नये. धन्वंतरी आरोग्य स्वास्थ योजना ही खरी कर्मचारी वर्गासाठी वरदायनी आहे. धन्वंतरी योजनेचा मालक हा महापालिकेचा प्रत्येक कर्मचारी आहे. धन्वंतरी योजना कायम ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गिय हक्क परिषदेचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी आयुक्त शेखर सिंह तसेच, कामगार आयुक्तांकडे केली आहे.
जगदाळे यांनी सांगितले की, विमा पॉलिसीमध्ये अनेक जाचक अटी असल्यामुळे महापालिकेतील ६० टक्के कर्मचारी हा विमा पॉलिसीमधून बाहेर फेकले जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता विमा पॉलिसीबाबत चुकीचे चित्र निर्माण केले आहे. पॉलिसीसंदर्भातील कर्माचाऱ्यांच्या मनामध्ये असलेले अनेक प्रश्न अनुत्तीर्ण आहेत. ते सोडविण्यास महापालिका प्रशासन असेल किंवा महासंघ असेल यांना यश आलेले नाही.
अनेक कर्मचाऱ्यांना महापालिकेत कार्यरत असताना आजार जडले आहेत. तसेच, आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बाबतीत काही आरोग्यविषयक गोष्टींना विमा पॉलिसीमध्ये कसे सामावून घेणार याबाबत शंका आहे. धन्वंतरी योजनाच लागू राहवी यासाठी असंख्य कर्मचारी धन्वंतरी योजना बचावसाठी निवेदनावर सह्या करत आहेत. प्रशासनाने निर्णय घेताना सर्व कर्मचाऱ्यांचे मत घेऊनच निर्णय घ्यावा अन्यथा प्रशासनाला असंतोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा जगदाळे यांनी दिला आहे.