न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, आमदार सुनील शेळके फाउंडेशन व रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २८ एप्रिल २०२४) रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळा, मारूती चौक येथे सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
या विवाह सोहळा संपर्क कार्यालयाचे उद्घाट्न सेवाधाम हॉस्पिटल जवळ सक्सेस चेंबर्स शॉप नं. १ या ठिकाणी डिस्ट्रिक्ट 3131 चे मेंबरशिप डायरेक्टर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 26-27 रो. नितीन ढमाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र घोजगे, कोंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणपत कदम, टाकवे बुद्रुकचे उपसरपंच अविनाश असवले, सोहळा समिती समन्वयक रो. दिलीप पारेख आदी उपस्थित होते.
हे संपर्क कार्यालय दररोज सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत उघडे राहणार आहे. यासाठी विहित कागदपत्रांसह लग्न करू इच्छिणाऱ्यांनी नोंदणीसाठी वधू वरांसोबत पालकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.
डिस्ट्रीक्ट 3131 रोटरी सिटीच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील क्लब निश्चितपणे या समाजपयोगी अनोख्या उपक्रमास मदत करतील, अशी ग्वाही नितीन ढमाले यांनी दिली. समाजातील गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात देऊन त्यांच्या प्रपंचाची आर्थिक घडी नीटपणे बसावी यासाठी रोटरी क्लब सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करत आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी केले. अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी सामुदायिक सोहळयाची रूपरेषा व कार्यपध्दती विशद केली तसेच वधू वरांनी पाळावयाचे नियम व लग्न सोहळयातील सुविधांची माहिती सांगितली. सामुदायिक विवाह सोहळयातून मावळ मधील जनतेने मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन शेंडे यांनी केले.
यावेळी रो. संजय मेहता, विश्वास कदम, रघुनाथ कश्यप, सुरेश दाभाडे, प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे, रामनाथ कलावडे, प्रदीप मुंगसे, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब रिकामे, हर्षल पंडित, तानाजी मराठे, बसाप्पा भंडारी, रमेश मराठे, राकेश ओसवाल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी केले तर उपाध्यक्ष किरण ओसवाल यांनी आभार मानले.
सामुदायिक विवाह सोहळयाची वैशिष्टये…
वधू-वरांची भव्य मिरवणूक, भव्य विवाह मंडपाची व्यवस्था
वधू-वरांना साखरपुडा, लग्नाचा पोशाख
वऱ्हाडी लोकांसाठी नाष्टा, जेवणाची सोय.
संसारोपयोगी भांडयाचा संच, शेगडीसह सिलेंडर, शिलाई मशिन, तसेच वधू-वरास विवाह प्रमाणपत्र
भाग्यवान वधू-वरास एक गीर गाई व वासरू इत्यादी वस्तू भेट















