- जागामालक व भंगार व्यावसायिकांवर किरकोळ कारवाई; नागरिकांमध्ये कुजबुज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२४) :- मोरवाडी, पिंपरी येथील अमृतेश्वर कॉलनीमागील रिकाम्या जागेतील रबर, प्लास्टिक, टायर, ड्रम अशा भंगार साहित्याला २१ फेब्रुवारी रोजी मोठी आग लागली होती. ती आग इतकी मोठी होती की, सलग तीन दिवस ती पूर्णपणे विझविण्यासाठी अग्रिशमन विभागास खटाटोप करावा लागला. अखेर, माती टाकून ती आग विझविण्यात आली.
संबंधित जागामालकास महापालिकेने नोटीस बजावली आहे. आग विझविण्यासाठी झालेला खर्च म्हणून १० लाख रुपये दंड म्हणून भरण्यास बजावले आहे. या प्रकरणी जागामालक अमृतेश्वर ट्रस्टचे विश्वास चितराव यांना महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी नोटीस बजावली आहे.
अमृतेश्वर कॉलनी येथील सर्व्हे क्रमांक ३६/१०/५७ येथील मोकळी जागा ही अमृतेश्वर ट्रस्टची आहे. त्या मोकळ्या जागेत औद्योगिक क्षेत्रातील रबर, प्लास्टिक, टायर, ड्रम व इतर भंगार साहित्य जमा करण्यात आले होते. त्या भंगार मालाला आग लागली होती. ती इतकी मोठी होती की आग आटोक्यात आणण्यासाठी १३ अग्निशमन बंब अपुरे पडले होते. तब्बल तीन दिवस आग धुमसत होती. मोकळ्या जागेत भंगार साहित्य जमा केल्याने आणि आगीस कारणीभूत ठरल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. तसेच, मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले. या कारणामुळे जागामालकास १० लाखांचा दंड करण्यात आला आहे. हा दंड मालमत्ताकरात समाविष्ट केला जाणार आहे. दरम्यान, जागामालक व भंगार व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.











