न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२४) :- राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रिडा प्रबोधिनी विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या अभियानाचा बक्षिस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, प्रधान सचिव रणजीत सिंह देवल यांच्या शुभहस्ते टाटा थिएटर नॅशनल सेंटर फोर परफॉर्मिंग आर्ट्स नरिमन पॉईंट मुंबई या ठिकाणी संपन्न झाला.
महापालिकेच्या वतीने शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर-घोडेकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराम वायळ, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानातंर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांमधील तसेच व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम अशा विविध बाबींचा समावेश होता. या बाबींच्या आधारे शाळांनी केलेल्या या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मुल्यांकन करण्यात आले.