- अन्यथा महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२४) :- महानगरपालिकेतील प्रत्येक कंत्राटी व मानधनावरील कामगाराला, दरमहा पगार स्लिप मिळत नाही. ती देण्यात यावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध उपक्रम आणि विभागात थेट मनपामार्फत आणि लेबर काॅन्टॅक्टर व वर्कस काॅन्ट्रॅक्टरमार्फत हजारो कंत्राटी कामगार काम करीत आहे. या कामगारांना दरमहा नियमितपणे पगार स्लीप दिली जात नाही. त्यामुळे त्यांना वैयक्तिक कर्ज, घरकर्ज, वैद्यकीय कर्ज, शिक्षण कर्ज काढणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे हजारो कंत्राटी कामगार हे सावकाराकडून व्याजाने पैसे घेत आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ही बाब कंत्राटी कामगारांचे शोषण करणारी असल्याने, अतिशय गंभीर आणि दखलपात्र गुन्ह्यासारखी आहे. सद्यस्थितीत याबाबत मनपा प्रशासनातील जबाबदार अधिकारी असलेले कामगार कल्याण अधिकारी, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख हे वर्षानुवर्षे अशा प्रकरणाकडे मुद्दामुन डोळेझाक करुन, आपली संविधानिक जबाबदारी टाळत आहेत. याबाबतीत कायमस्वरुपी उपाययोजना न झाल्यास, 10 एप्रिल 2024 नंतर, संबधित जबाबदार मनपा अधिकारी आणि पे मास्टर यांच्या विरोधात भारतीय पोलिस दंडसहिंता (आयपीसी) कलम 217 नुसार शहरातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवावा लागेल, असे हनुमंत लांडगे यांनी पत्रकात म्हटले आहे.















