- रहाटणीतील रक्तदान शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२४) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रहाटणी येथील अश्वारूढ स्मारकाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या वतीने रक्तदान शबिराचे आयोजन करण्यात आले होते. या विक्रमी रक्तदान शिबिरात चारशेपेक्षा अधिक जणांनी सहभागी होत रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरात सर्व जातीधर्माच्या लोकांनी भाग घेतला. शिबिरात सहभागी होणाऱ्यांमध्ये तरुणींनीही सहभाग घेतला होता. तसेच, रक्तदान हे जगातील श्रेष्ठदान असं म्हटलं जाते आणि रक्ताला कोणताही जात-धर्म नसतो. आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून नेमका हाच संदेश दिला. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रहाटणीमध्ये जोरदार चर्चा होत आहे. तसेच हे शिबिर आयोजित करणारे आयोजक आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचेही अभिनंदन केले जात आहे.
आयोजक चंद्रकांत नखाते म्हणाले, कोणत्याही रुग्णाला जेव्हा रक्ताची गरज भासते. त्यावेळी त्याला रक्त चढवताना ते कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा आहे हे पाहिले जात नाही. कोणत्या जातीच्या माणसाने रक्त दिले हे पाहिले जात नाही. तर केवळ त्याचा रक्तगट तपासून गरजू व्यक्तीला रक्त चढवले जाते. जात आणि धर्म या सर्वांपेक्षा आपण सर्व जण भारतीय आहोत हे महत्वाचे आहे. याच संकल्पनेतून आणि हाच एकतेचा संदेश देण्यासाठी हे रक्तदान शिबीर घेण्यात आल्याची माहिती नखाते यांनी दिली.











