- पिवळसर रंगाच्या बेचव पाण्यामुळे नागरिक आजारांनी झालेत बेजार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२४) :- मोशी परिसरातील संपूर्ण गावठाण, सोसायट्या, वाड्या- वस्त्यांवर महापालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्याबाबत नागरिक तक्रारी करत आहेत. पिवळसर रंगाचे बेचव पाणी अनेक दिवसांपासून येत असून, त्या पाण्याला वासही येत आहे. यामुळे येथील नागरिकांना घशाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
मोशी परिसरातील अनेक घरात फिल्टर आहेत. मात्र, महापालिकेकडून पुरवठा होणारे पाणी पिवळसर रंगाचे व बेचव असल्याने फिल्टरमधून शुद्ध होत नाही. बोऱ्हाडेवस्ती ते टोल नाक्यापर्यंत नागरी वस्तीत असा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिक बाटलीबंद पाणी विकत घेऊ लागले आहेत. मात्र, महापालिका अधिकारी तांत्रिक कारणे देऊन वेळ मारून नेत आहेत. रुग्णालयाचा आणि पाणी विकत घेण्याचा भुर्दंड सहन करणारे नागरिक हैराण झाले आहेत.
पूर्वी मोशी परिसरातील नागरिकांना पवना धरणातून स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, आता भामा- आसखेड योजनेच्या नावाखाली नक्की कोणत्या नदीतून पाणीपुरवठा केला जात आहे, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पूर्वीसारखा पिण्यायोग्य व दुर्गंधीविरहित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.











