- बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२४) :- तळेगाव दाभाडे कोणत्याही परिस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांचे काम करणार नाही, मावळ लोकसभा मतदारसंघातून बाळा भेगडे यांचे नाव भाजपचे उमेदवार म्हणून निश्चित करावे, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष, मावळ तालुका कोअर कमिटी आणि शिष्टमंडळाने मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घ्यावी, अशी मागणी करत मावळ तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते शनिवारी आक्रमक झाले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या तळेगाव येथील निवासस्थानी सकाळी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, मावळ विधानसभा निवडणूक प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे, मावळ विधानसभा विस्तारक रवी देशपांडे, भास्करराव म्हाळसकर, धोंडीबा मराठे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, बाळासाहेब घोटकुले, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन मराठे, दत्तात्रय माळी उपस्थित होते. उमेदवारी मिळाली नाही तर अशोक दाभाडे, लहू शेलार, दत्तात्रय माळी आदींनी सामूहिक राजीनामे देणार असल्याची घोषणा केली.
रवींद्र भेगडे म्हणाले, निवडून येण्याची क्षमता पाहता भेगडे यांचीच उमेद्वारी सर्वसमावेशक आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे म्हणाले की, बारणेंना दोनदा खासदारकीचे तिकीट मिळवून देण्यात आणि विजयी करण्यात वाटा असलेल्यांचा आणि युतीच्या धर्माचा विसर बारणेंना पडला आहे.
रवी देशपांडे म्हणाले की, मी मावळ मतदारसंघात विस्तारकपदाची जबाबदारी ११ जानेवारीला स्वीकारली. त्यानंतर मावळमधील पक्षसंघटनेची माहिती घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील भाजपच्या कार्यकत्यांची भावना तीव्र आहे. हा मतदारसंघ भाजपला देण्याचा उल्लेख मी अहवालात केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षा घेऊन उमेदवारी भाजपलाच द्यावी.
कार्यकर्त्यांना त्यांची भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व जागांवर विजय मिळविणे महत्वाचे आहे. – बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री…











