एकाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन-दोन मतदारसंघ कशासाठी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२४) :- निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मात्र, एकाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन-दोन मतदारसंघात नेमण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने असे प्रकार घडत आहेत. मात्र, एका ठिकाणची नियुक्ती रद्द करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. ठरावीक मतदारसंघासाठी अनेक कर्मचारी नेमण्यात आल्याच्या तक्रारीही होऊ लागल्या आहेत.
मावळ व शिरूर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवार (दि. १६) पासून लागू झाली आहे. त्याअंतर्गत शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी असे विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी नेमले आहेत. निवडणूक विषयक कामकाजासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक, भोजन, कार्यालय, आदी व्यवस्था, जनजागृती, कारवाई करणे, आदी कामासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत. दोन मतदारसंघात नेमणूक दिल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे.
महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. परिणामी, महापालिकेत प्रत्येक विभागात तुरळक गर्दी दिसत आहे.














