न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २१ मार्च २०२४) :- देहूगाव नगरपंचायतीच्या वतीने वर्षाच्या अखेरीस करदात्यांना कर भरण्यासाठी आवाहन करूनही कर न भरलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाईचा बडगा उगारला असून, बुधवारी (दि. २१) कर संकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही कंपन्या सील केल्या आहेत.
या कारवाईत कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात, कर संकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, पाणीपुरवठा अधिकारी धनंजय नाईकवडे, कर विभागातील कर्मचारी आशा मोरे, अजय वाल्मीकी, आसिफ शेख, सुरेश खंडागळे, दत्ता शिंदे, महेश पाटोळे, ज्ञानेश्वर निकम, प्रतीक चव्हाण व पोलिसांच्या उपस्थितीत या पथकाने ही कारवाई केली. नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे देहूगावातील थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत माहिती देताना कर संकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले, देहू बाह्यवळण मार्गावर चालू स्थितीत असलेल्या चार कंपन्या सील केल्या आहेत. यापैकी तीन कंपन्या एकाच मालकाच्या असून, त्यांच्याकडे तीन कंपन्या मिळून १३ लाख ६५ हजार रुपये थकबाकी आहे. तर एका कंपनी मालकाकडे सात लाख ९० हजार रुपये थकबाकी आहे.
या कंपन्यांना कर भरण्यासंदर्भात सूचना देण्यासाठी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांना वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. या चारही कंपन्या जागा मालकांनी भाड्याने दिल्या असून, कंपनीकडून ते नियमित भाडे वसूलही करीत आहेत. मात्र, कर भरण्यास ते टाळाटाळ करीत असल्याने या कंपन्यांवर कारवाई करून त्या सील करण्यात आल्या.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात नगरपंचायतीने कर वसुलीसाठी नोटिसा बजावून, दवंडी देऊन कर भरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मालमत्ता धारकांच्या घरांपुढे ढोल वाजवून सुमारे चार कोटी रुपयांची वसुली केली होती. तर महिनाअखेरीस जोरदार करवसुली मोहीम सुरू केली आहे.















