न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२४) :- उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीप्रकरणी रेल्वेच्या सेवानिवृत्त ट्रॅकमॅनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.
मल्लीनाथ भीमाशंकर नोल्ला (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. मल्लीनाथ हा रेल्वेच्या अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) विभागात ट्रॅकमॅनवर होता. खडकी स्टेशन येथे कार्यरत असताना ऑगस्ट २०२३ मध्ये तो सेवानिवृत्त झाला.
दरम्यान, मल्लीनाथ याने एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःच्या तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त प्रमाणात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.













