- केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरीत आप व इंडियाकडून आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२४) :- अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरी, मोरवाडी येथे बीजेपीच्या कार्यालयासमोर आप व इंडिया आघाडीच्या घटक पक्षातर्फे तीव्र आंदोलन घेण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे नेते माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी निषेध नोंदविताना सांगितले की, भारतामधील प्रमुख विरोधी पक्षामधील एक बुलंद आवाज बंद करायचा असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. सध्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत व सर्वेनुसार भारतीय जनता पक्षाला १५० जागासुद्धा मिळणे कठीण आहे. त्यामुळे बिथरल्यासारखे भारतीय जनता पक्ष काम करत आहेत. काही दिवसापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व आत्ता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक त्याच भीतीने केली आहे. आम्ही ह्या घटनेचा विरोध करत आहोत.
पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्ष मीना जावळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, 2014 पासून भारतामध्ये एका जुलमी हुकमशहाचा जन्म झाला व भारताला जर्मनीच्या हिटलरशाही मार्गावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, इतिहास साक्षीदार आहे, जेव्हा हुकूमशहा जन्माला येतो तेव्हा तेव्हा भगतसिंग सुद्धा जन्म घेतात, आपच्या प्रमुख चार नेत्यांना BJP सरकारने सुडुबुद्धीने अटक केली आहे. परंतु मोदींना हे माहित नाहीये की आपचा शेवटचा कार्यकर्ता हा अरविंद केजरीवालच आहे, आणि आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देऊ.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डॉ. मनिषा गरुड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे सागर चिंचवडे, भोंडवे, सीपीएमचे गणेश दराडे, समाजवादी पक्षातर्फे यादव, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, आपचे राज्य पदाधिकारी चेतन बेंद्रे, मयूर दौंडकर तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते व आपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने या अटकेचा विरोध केला.















