न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- होळी, धुळवड, रंगपंचमी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपरी बाजारपेठेत उत्साहाचे रंग पाहायला मिळत आहेत. लहान- मोठ्या पिचकाऱ्या, फुगे, विविध रंग, गुलाल, रंगाचे सो याने बाजारपेठ सजली असून, बच्चे कंपनी, तरुणाईची खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
शहरात रंगांची उधळण करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी अनेक मंडळांनी, संस्थांनी होळी, धुळवड, रंगपंचमीची जय्यत तयारी सुरू केली आहे.
उद्या रविवारी होळी आणि सोमवारी धुळवड आणि शनिवारी रंगपंचमी असून, रंग, गुलाल, पिचकाऱ्यांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे पिंपरी बाजारपेठेतही विविध रंग, गुलाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून, चौकाचौकांमध्ये दुकाने थाटण्यात आली आहेत.
सध्या बाजारात १० ते एक हजार रुपयांपर्यंत पिचकाऱ्या उपलब्ध असून, १० ते १५० रुपयांपर्यंत फुग्यांची पाकिटे उपलब्ध आहेत. या स्टॉलवर बच्चे कंपनी पालकांसह गर्दी करू लागली आहे.
नैसर्गिक रंगांना पसंती
धुळवड, रंगपंचमीसाठी तरुणाईकडून विविध रंग, गुलालाला मागणी वाढली आहे. जनजागृतीमुळे नागरिक आता नैसर्गिक रंग आणि हर्बल गुलालाला पसंती देत आहेत. नैसर्गिक रंग, हर्बल गुलाल, सुगंधित गुलाल, गुलाल स्प्रे बाजारात १५० ते २,२०० रुपयांपर्यंतच्या कॅनमध्ये उपलब्ध आहे. तसेच २० ते ५० रुपयांपर्यंत रंगांची छोटी पाकिटे उपलब्ध आहेत.













