- अमोल कोल्हे यांचं आढळरावांना आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात वीस वर्षे टोकाचा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन कसे होणार? असा सवाल शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. राजगुरूनगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मतदारसंघातील विकासकामांबाबत समाेरासमोर बसून चर्चेस तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.
शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना डाॅ. कोल्हे म्हणाले, की आढळराव नाईलाजाचे उमेदवार ठरले आहेत.
महायुतीकडे माझ्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी ताकदीचा उमेदवार नाही. आढळराव यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीची तुलना माझ्या पाच वर्षांतील कारकिर्दीशी करणे अयोग्य आहे. राजकारण हा माझा पिंड नाही, हा दावा अजित पवार यांनी संदर्भासह स्पष्ट करावा, असेही ते म्हणाले.













