- पांडाभाऊ साने यांचे चिखली पोलीसांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२४) :- चिखली येथील मोरे वस्ती परिसरात अज्ञातांनी पहाटेच्या वेळी सुमारे ६ मेडिकल ५ किराणा दुकान व ३ गॅरेज अश्या बऱ्याच दुकानांची तोडफोड करून जबर चोरी केली. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न भविष्यात निर्माण होवू नये यासाठी चिखली हद्दीत रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीत वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना निवेदन दिले आहे.
साने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, चिखली मोरे वस्ती परिसरात घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. असे प्रकार करून काहीजण परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या वृत्तीला जागीच ठेचले पाहिजे. तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे. तसेच असे प्रकार पुढे घडू नयेत यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीत अधिकची वाढ करावी, अशी मागणी केली आहे. त्यावर याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून असे प्रकार होणार नाहीत यासाठी पोलीस प्रशासन काम करत असल्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे, असे साने यांनी पत्रात म्हटले आहे.