न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२४) :- पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कारवाई होती घेण्यात आली आहे. नळाला मोटारी लावून बेकायदेशीरपणे पाणी ओढणाऱ्या १९ पंपावर पाणी पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
जुनी सांगवीमध्ये इलेक्ट्रिक मोटार लावून पाणी घेणाऱ्या १९ मोटार पंप जप्त केले आहेत. जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटीमधील १ ते १० लेनमध्ये असणाऱ्या अनधिकृत मोटार पंपावर महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली. याप्रसंगी महापालिकेचे उपअभियंता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता साकेत पावरा, सागर पाटील, संदीप खेपले, सहायक अभियंता श्वेता डोंगरे, सांगवी पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर, मजूर वॉल्व्ह ऑपरेटर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पर्यवेक्षक किरण गुजले, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सर्व नागरिकांना समान पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने नळजोड दिले आहेत. पालिकेच्या प्रभाग ३२ मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. योग्य दाबाने पाणीपुरवठा होत असतानाही अनेकदा कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला येत होत्या. अखेर त्याची शहानिशा करून १९ मोटर पंपावर कारवाई करण्यात आली.