- अग्निशामक वाहन, ७३ बसेस, रुग्णवाहिका, पाण्याच्या टँकरचीही सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२४) :- मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने पिंपरी विधानसभा (अ.जा.) कार्यालयाच्या वतीने मतदान अधिकाऱ्यांना एक दिवस आधी मतदान यंत्र व निवडणूक साहित्य वितरण व मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र स्वीकृती केंद्राचे ऑटो क्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ येथे नियोजन करणेत आलेले आहे.
मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्य वितरण व मतदान झाल्यावर स्वीकृती प्रक्रियेची पाहणी मावळ लोकसभा मतदासंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिथी राजशेखर यांनी केली. यावेळी पिंपरी विधानसभा संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी नियोजनाची माहिती दिली.
पिंपरी विधानसभा मतदासंघामध्ये ५२ सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती केलेली असून ८५ इमारतीमध्ये ४०० मतदान केंद्र नेमून दिलेली आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान अधिकारी कर्मचारी यांची टीम मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्राची रचना व इतर अनुषंगिक कामे पूर्ण करणार आहेत. त्यासाठी निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार तिसरे प्रशिक्षण देवून साहित्य वितरण करणेत येणार आहे. मतदान अधिकारी कर्मचारी यांना मतदान केंद्रावर घेवून जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या ७३ बसेस ची सोय केलेली आहे. तसेच अग्निशामक दलाचे वाहन, रुग्णवाहिका, पाण्याचा टँकर उपलब्ध करणेत येणार आहे. मतदान अधिकारी कर्मचारी यांच्या वाहनासाठी पार्किंगची सोय करणेत आलेली आहे. साहित्य वितरण व स्विकृती साठी केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी निवडणुक निरीक्षक यांचे समन्वयक प्रमोद ओंभासे,सुनिल भागवाणी,साहित्य वितरण व स्वीकृती कक्षाचे नोडल ऑफिसर सुनिल पवार, गिरीष गुठे,भांडार विभागाचे नोडल अधिकारी तुषार पडवळ उपस्थित होते.