न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२४) :- मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. अनधिकृत होर्डिग धारकास नोटीस बजावा. नोटीस बजावून काय कारवाई केली?, याचा सविस्तर अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अशा प्रकारचे अपघात गेल्या तीन वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातही घडले आहेत. या दुर्घटनेच्या पाश्वंभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी महापालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस व नजीकच्या मॉन्सूनच्या हंगामात पडणाऱ्या पावसाची शक्यता विचारात घेऊन जीवित आणि मालमता हानी होऊन वाहतुकीस अडथळा होऊ नये, याकरिता परवानगी देण्यात आलेल्या सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट नव्याने करुन घेण्यास संबंधित होर्डिंगधारकास कळवावे.
ऑडिट केल्याचा दाखला १५ दिवसांत सादर करण्यास सांगावे. महापालिका हद्दीतील स्ट्रक्चरल ऑडिट न केलेले सर्व होर्डिंग अनधिकृत समजून होर्डिंग धारकास नोटीस द्यावी. होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करावी. तसेच, सर्व अनधिकृत होर्डिंगवर सक्त कारवाई करण्यात यावी. त्यामध्ये प्रामुख्याने धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी. नव्याने स्ट्रॅक्चरल ऑडिट केल्याचे प्रमाणित दाखले सादर करावेत. यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट न केलेल्या होर्डिंग धारकांना नोटीस देऊन त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, याचा देखील अहवाल जिल्हाधिकारी यांनी मागवून घेतला आहे.
अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या अनेक होर्डिंग्जवर यापूर्वीच निष्कशनाची कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या धोकायदायक स्थितीतील एकही होर्डिंग्ज शहरात नाही. बेकायदेशीर होर्डिंग्ज, फलक, फ्लेक्स उभारणाऱ्या जागा मालकांना अथवा संस्थांना वेळोवेळी नोटीसा देऊन त्यांच्यावर कारवाई करणे सुरुच आहे.
– संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग…











