- तेलगू देसम वगळता भाजपच्या सर्व मित्रपक्षांची अवस्था बिकट?..
- मोदींऐवजी उमेदवारांच्या प्रतिमेवर मतदान झाल्यास तोटा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२४) :- २००४ प्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला एनडीएच्या मित्रपक्षांच्या जागा जिंकण्याबाबत साशंकता आहे. भाजपप्रमाणेच एनडीएचे मित्रपक्षही निवडणुका जिंकण्यासाठी पूर्णपणे ‘मोदी मॅजिक’वर अवलंबून आहेत. निवडणुकीच्या मैदानातून मिळणारी माहिती आणि सर्वेक्षण संस्थांच्या अहवालानुसार आंध्र प्रदेशातील त्यांचा मित्रपक्ष असलेला तेलगू देसम पक्ष वगळता भाजपच्या सर्व मित्रपक्षांची अवस्था बिकट आहे.
२००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकार पडण्याचे एकमेव कारण म्हणजे भाजपच्या मित्रपक्षांचा झालेला पराभव. भाजप आणि काँग्रेसमधील जागांमध्ये फारसा फरक नव्हता. काँग्रेसने १४५, तर भाजपने १३८ जागा जिंकल्या होत्या. पण, यूपीएमधील काँग्रेसच्या मित्रपक्षांना जास्त जागा मिळाल्या होत्या. मतदानाच्या चार टप्प्यात आतापर्यंत ३८० जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन टप्प्यांत १७ दिवसांत १६३ जागांवर मतदान होणार आहे. सध्या भाजपनेही त्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. एकदा २७२ चा जादुई आकडा ओलांडला की, सरकारमध्ये सहभागी होणारे सहकारी पक्ष अनेक मिळू शकतात, हे भाजप जाणून आहे. बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेसने भाजपला यापूर्वीही पाठिंबा दिलेला आहे.
२०१९ प्रमाणेच पंतप्रधान मोदींचा करिष्मा आणि जादू अशीच राहिली तर भाजप आणि मित्रपक्षांच्या जागांची संख्या ४०० च्या पुढे जाईल यात शंका नाही. पण, उमेदवारांच्या प्रतिमेवर मतदान झाल्यास तोटा सहन करावा लागू शकतो.
‘मोदी मॅजिकचा फायदा भाजपच्या उमेदवारांना मिळत आहे. पण, तो मित्रपक्षांना मिळत नसल्याचे अहवालात दिसते. बिहारमध्ये भाजपचे उमेदवार चांगली कामगिरी करीत आहेतः पण, मित्रपक्ष जनता दल (यू) आणि लोक जनशक्ती पक्षाच्या जागा फसलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपच्या मित्रपक्षांबाबत चिता आहे.











