- गॅस शेगड्या दुरुस्तीच्या स्पर्धेतून घडले होते कांड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२४) :- गोळ्या झाडुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपींना चिखली पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी करीत अवघ्या दोन तासातच बेड्या ठोकल्या आहेत. (दि. १२) रोजी सायंकाळी ०६.०० च्या सुमारास जाधववाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे जवळ सार्वजनिक रोडवर हा प्रकार घडला होता. अजय सुनिल फुले (वय १९ वर्ष धंदा व्यवसाय, रा. महावीर पार्क सोसायटी, गायवासरू चौक, मोहननगर, चिंचवड) याच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली.
तपासात त्याने सांगितले कि, “आरोपी हर्षल सोनावणे व त्यांचे दोघाचेही जाधववाडी परीसरात गॅस शेगड्या दुरुस्तीची दुकाने असुन त्याच्यात गेल्या सहा महिन्यापासुन व्यवसायीक वाद होते. गि-हाइक तोडण्याच्या प्रकारावरुन त्याच्यात वारंवार खटके उडत होते. याच बाबीचा राग मनात धरुन हर्षल सोनवणे याने शाम चौधरी व किर्तीकुमार लिलारे हयाच्या सोबत कट करुन आरोपी शाम चौधरी व किर्तीकुमार यांना त्याच्या दुकानावर पाठवुन त्याच्यातील वाद मिटवण्याच्या बहान्याने चर्चा करण्यासाठी त्यास जाधववाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे जवळ सार्वजनिक रोड वर घेवुन गेले. तेथे चर्चा करत असताना नियोजीत कटानुसार हर्षल सोनावणे हा तेथे आला व त्याने त्याचे कमरेला असलेले पिस्टल काढून त्यातुन तीन गोळया फ़िर्यादीवर झाडल्या. त्यापैकी एक गोळी फ़िर्यादीचे दंडाला लागून त्यास जखमी केले तर दुसरी गोळी सहआरोपी किर्तीकुमार लिलारे यास मानेला लागली.” त्यानंतर फिर्यादी अजय फुले यांना तात्काळ उपचाराकरीता वाय.सी.एम. हॉस्पीटल पिंपरी पुणे येथे पाठवुन त्यांचे तक्रारीवरुन चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर २८२/२०२४ भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ५०४,३४ आर्म अॅक्ट ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
निवडणुकीच्या एक दिवस आधी गोळाबाराचा प्रकार घडल्याने वरीष्ट पातळीवरुन तात्काळ त्याची दखल घेवुन घटनेथे गांभिर्य लक्षात घेवुन ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली चिखली पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उध्दव खाडे व तपास पथक यांनी तात्काळ तपास सुरु केला. तपासात एक आरोपी जखमी असल्याची माहिती मिळाल्याने एक पथक तात्काळ घटनास्थळाचे परीसरातील हॉस्पीटल चेक करणेकामी पाठविण्यात आले. सदर पथकाने हॉस्पिटलमधील डॉक्टराच्या वॉटस अप ग्रुपवर माहिती प्रसारीत केली असता, गुन्हयातील जखमी आरोपी किर्तीकुमार लिलारे हा ओझोन हॉस्पीटल, मोरवाडी, पिंपरी पुणे येथे अॅडमिट असल्याची माहीती मिळाली. त्याच्याकडून प्राप्त माहितीच्या अधारावर पोलीसांनी पुढिल तपास सुरु केला.
दाखल गुन्हयाचा समांतर तपास करत असलेले गुन्हे शाखा, युनिट-१ चे पो.नि. गोरक्ष कुंभार याच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या अधारावर पाहिजे आरोपी श्याम चौधरी यास देहूरोड परीसरातून ताब्यात घेण्यात यश मिळवले. गोळीबार करणारा मुख्य आरोपी हर्षल सोनावणे हा घटनेनंतर त्याचा मोबाईल बंद करून पळून गेलेला होता. चिखली पोलीस तपास पथकाने त्याच्या पळून जाण्याच्या संभाव्य रस्त्यावर लक्ष केंद्रीत केले असता तो चाकणच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले. स.पो.नि. उदधव खाडे व पथकाने त्याचा पाठपुरावा करत, माग काढत शेवटी त्यास नाणेकरवाडी, चाकण परीसरातून पकड्यात यश मिळवले. तपासात अटक आरोपी व फ़िर्यादी यांचे कोणत्याही राजकिय पक्षाशी कोणत्याच प्रकारचे हितसंबध नसल्याचे निष्पन्न झालेले आहे. अश्या प्रकाराने संवेदनशिल कालावधीतील गंभीर गुन्ह्यातील आरोपीना दोन तासात अटक करण्यात चिखली पोलीस स्टेशन वय गुन्हे शाखा, युनिट-१ यांना यश मिळालेले आहे.












