- पालिकेकडून थेरगावात साकारणार ‘पीपीपी’ तत्वावर प्रकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून थेरगाव येथे पीपीपी (पब्लिक, प्रायव्हेट, पार्टनरशिप) तत्त्वावर कॅन्सर (कर्करोग) रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, रुग्णांसाठी उपचाराची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात सोय उपलब्ध नाही. त्यामुळे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. शहरातील गोरगरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळावेत, या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत शहरातील पीपीपी तत्त्वावर असलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
थेरगाव येथील रुग्णालयाच्या जवळ ३५ गुंठे जागा आहे. या जागेत पीपीपी तत्त्वावर ६० बेडचे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी निविदेची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. रुग्णालयाची उभारणी झाल्यानंतर महापालिका ठरवून देईल, त्यानुसारच दर आकारणे बंधनकारक करण्यात येणार आहे
रुग्णालय उभारण्यासाठी चार ठेकेदारांनी पुढाकार घेतल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता सुरू आहे. परिणामी, कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची प्रक्रिया रखडली आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.












