- युवा नेते पांडाभाऊ साने यांचे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाला निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२४) :- पावसाळा सुरू होण्यास केवळ पंधरा दिवसच बाकी आहेत. या दरम्यान चिखलीतील सानेवस्ती-मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती-ताम्हाणेवस्ती परिसरातील ड्रेनेज लाईनची साफसफाई करावी, अशी मागणी शहर भाजपाचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी पालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात साने यांनी म्हटले आहे कि, ”अवकाळी पावसामुळे सानेवस्ती-मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती-ताम्हाणेवस्ती परिसरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. अशातच येथील सोसायटीतील ड्रेनेज समस्या अजूनही कायम आहेत. काही ड्रेनेजलाईन दिवसाआड तुंबतात. त्यावर तात्पुरता तोडगा काढला जातो. परंतु, पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसामुळे ड्रेनेजलाईनमधील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येते.
ते पाणी नागरिकांच्या घरात जाते. घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व ड्रेनेजलाईनची मोठ्या व्याकुम प्रेशरने साफसफाई आणि उपाययोजना करावी. पाणी साचण्याच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करून पाण्याचा जलद गतीने निचरा होण्याकामी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, जेणेकरून नागरिकांना पावसाळयात निर्धोक राहता येईल, असे या निवेदनात साने यांनी म्हटले आहे.














