- आता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नव्याने धोरण राबविणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करत आणलेले पे अॅण्ड पार्क धोरण अखेर गुंडाळण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ४ ठिकाणी सुरू असलेल्या पार्किंग ठेक्याची मुदत संपल्याने यापुढे पार्किंग धोरण राबविणार नसल्याचे पत्र ठेकेदाराने महापालिकेला नुकतेच दिले आहे. वाहनचालकांना शिस्त लागेल, वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ‘पे अॅण्ड पार्क’ राबविण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती दिली.
शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यःस्थितीत शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या जवळपास असून वाहनांची संख्या २४ लाख आहे. गेल्या तीन वर्षांत पावणेचार लाख वाहनांची भर पडली आहे. वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. प्रशासनाने वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे यांसाठी पे अॅण्ड पार्क धोरण राबविले.
पहिल्या टप्प्यात शहरातील ८० ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात २० ठिकाणीच १ जुलै २०२१ पासून ‘पे अॅण्ड पार्क’ च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. काही महिन्यातच निर्मला ऑटो केअर या ठेकेदाराने उत्पन्न आणि कर्मचारी वर्गावर होणारा खर्च पाहता काम परवडत नसल्याचे सांगत २० पैकी १६ ठिकाणची योजना गुंडाळली.
चिंचवड गावातील चापेकर चौक, संत मदर तेरेसा उड्डाणपूल, नाशिक फाटा, निगडीतील उड्डाणपूल अशा चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अॅण्ड पार्क’ सुरू होते; मात्र याचीही मुदत ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत होती. ती संपल्यानंतर निर्मला ऑटो केअर या ठेकेदाराने आपण काम थांबवत असल्याचे महापालिकेला पत्र दिले आहे.
शहरातील वाहतूक कोंडी आणि अस्ताव्यस्त पार्किंगचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. पे अॅण्ड पार्कचे धोरण त्यापैकीच एक आहे. हा उपक्रम पडला नाही तर तो क्षेत्रीय स्तरावर राबविण्याचे धोरण आखण्यात येत आहे.
– शेखर सिंह, आयुक्त, महापालिका…














