- मुलभूत सुविधांपासून रुग्णांसह नातेवाईक वंचित..
- स्वच्छतागृहाजवळून जातानाही नागरिकांना नाक दाबून जावे लागते…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात (वायसीएम) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पिण्यासाठी पाणी व स्वच्छतागृहातही पाणी नसते, फॅन नाहीत, त्यामुळे नातेवाईक हैराण झाले असून महापालिकेने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वायसीएम रुग्णालयात राज्याच्या विविध भागासह शहर व उपनगरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यासाठी अनेक रुग्ण अॅडमिट होत असतात. त्यांच्याबरोबर एक किंवा दोन नातेवाईक मुक्कामी थांबतात. मात्र, नातेवाइकांसाठी वायसीएम रुग्णालयात कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. येथे उपचार घेत असलेले रुग्ण गरीब, सर्वसामान्य घरातील असल्याने नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये महिलांचाही संख्या जास्त असते.
साधारणपणे रात्री १२ नंतर रुग्णालयातील नळांना पाणी नसते. ते सकाळी सहाच्या सुमारास येते. या रुग्णालयात रात्रभर अपघात, मारामारी, इतर उपचारासाठी रुग्ण येत असतात. येथे मुक्कामी असलेल्या नातेवाइकांच्या व्यतिरिक्त अजून नातेवाईक रात्री रुग्णालयात येतात. मात्र, रुग्णालयातील स्वच्छतागृहात पाणी नसते. त्यामुळे नातेवाईक संताप व्यक्त करतात. सकाळपर्यंत स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाण झालेली असते. या बाबी महापालिका व रुग्णालय प्रशासनाला माहिती असून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे नातेवाईक सांगत आहेत.
तळमजला व पहिल्या मजल्यावर असलेल्या पडव्यांमध्ये व प्रवेशद्वाराच्या मोकळ्या जागेत नातेवाईक रात्रीचे झोपत असतात. मात्र, या ठिकाणी फॅनची सुविधा नाही, तसेच आजूबाजूने बंदिस्त केले असल्याने हवा खेळती राहत नाही. त्यामुळे नातेवाईक उकाड्याने बेहाल होतात. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.
तळमजला व पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. स्वच्छतागृहाजवळून जातानाही नागरिकांना नाक दाबून जावे लागते. स्वच्छतागृहात हँडवॉश नसतो. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असून रुग्णांसह नातेवाईकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
दिवसभर सुरु असलेल्या विद्युत मोटारींना आराम दिला जातो. यामुळे रात्री १२ ते ५ पर्यंत पाणी बंद असते. मात्र, टाकीत स्टोअर केलेले पाणी वॉर्डासाठी वापरले जाते. नातेवाईक जास्त थांबल्याने हॉस्पिटलवर ताण येतो. फॅन पुरेशा प्रमाणात बसविले आहेत.
– डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका…

















