- खरे लाभार्थी वगळून स्वयंघोषित संघटनेला विनामूल्य जागा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ या स्वयंघोषित संघटनेला पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे. शहरात दोन लाख टपरीधारक व हातगाडी धारक असताना पालिका आयुक्त शेखर सिंह हे ठराविक संघटनेलाच जागा कशी काय देऊ शकतात?, असा सवाल शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, इतर टपरीधारक व हातगाडी धारक ह्यांच्या विरोधात पालिका दुसरीकडे अतिक्रमण कारवाई करत आहे. शहरातील हॉकर्स सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. पात्र लाभार्थीना वगळून नवीन हॉकर्स धारकांची बोगस नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र टपरीधारक व हातगाडी धारक यांच्यावर अन्याय झाला आहे.
या स्वयंघोषित संघटनेचे अध्यक्ष टपरीधारक व हातगाडी धारक यांच्याकडून हातगाडी धारक व टपरीधारक यांना विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात आली असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने मासिक भाडे वसूल करीत आहेत. शहरातील हातगाडी धारक व टपरीधारक यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच नवीन हॉकर्स धोरण जाहीर करण्यात यावे, अशी मागणी सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.











