- ‘पक्षांतर्गत कलह निर्माण करण्यासाठी बेताल वक्तव्य’..
- शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांचा पलटवार अंन वक्तव्याचा निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२४) :- आ. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप हे दोघेही एकच असून स्वतःच्या घरातच पदं राखण्यासाठी वादंग निर्माण करीत असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल थोरात यांनी केला आहे. व्यंगचित्र काढून त्यावर कोटीही केली आहे. दरम्यान शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी घरचाच आहेर दुबार फिरवत अमोल थोरात यांच्या वक्तव्यावरच पलटवार केला आहे. पक्षांतर्गत कलह निर्माण करण्यासाठीच अमोल थोरात यांनी असे बेताल वक्तव्य केले आहे, तो निराधार आहे, असा आरोप त्यांनी थेट थोरात यांच्यावर केला आहे. त्यामुळे चिंचवड मतदार संघात कमालीचं राजकीय वातावरण पेटलं आहे.
दरम्यान काळभोर म्हणाले, वैयक्तिक पातळीवर नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता नसलेले प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल थोरात यांनी दुसऱ्या नेत्यांच्या इशाऱ्यावरून थेट भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप व आमदार अश्विनीताई जगताप यांच्या विरोधात वक्तव्य अनं व्यंगचित्र काढले आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली आहे. अमोल थोरात हे पक्षांतर्गत कलह निर्माण करण्यासाठी बेताल वक्तव्य अन पक्षात तेढ निर्माण करत आहेत. त्यांची वैयक्तिक नाराजी होती तर पक्षश्रेष्ठी यांना वैयक्तिक पातळीवर लेखी स्वरूपात मागणी करायची होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक टिका टिपणी कोणाच्या इशाऱ्यावरून अमोल थोरात करत आहेत. त्याचा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून जाहीर निषेध व्यक्त करीत असल्याचे सचिन काळभोर म्हणाले आहेत.
असा घडला प्रकार…
‘काही ही झालं तरी मी चिंचवड विधानसभेतून लढणार’, असा ठाम निश्चय शंकर जगतापांनी केला. मात्र, भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी आणि शंकर जगताप यांच्या वहिनी अश्विनी जगताप या रिंगणात असल्यावरही तुम्ही लढणार का? यावर उत्तर देताना ते ‘हे येणारा काळच ठरवेल. मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे’, असं ते म्हणाले होते. दरम्यान भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल थोरात यांनी याबाबत एका माध्यमाला प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग स्वतः असे धोरण आहे. मात्र, इथे याला हरताळ फासून गृहकलह चालू केला आहे. हा पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी चुकीचा संदेश आहे. घरामध्ये सत्ता रहावी असा त्यांचा रोख दिसतोय. अध्यक्षपद एकाकडे आणि आमदारकी एकाकडे अशा प्रकारे ते घरातून एकच आहेत, असं वाटतय. व्यंगचित्राद्वारे कार्यकर्त्यांची भावना दाखविली आहे, असे ते त्यात म्हटले होते.















