- भूखंड पालिकेकडे हस्तांतरित करा; भाजपा आमदार महेश लांडगे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२४) :- भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेले भारतीय संविधान आणि जगभरातील लोकशाही देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी तसेच संविधान जागृतीकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या माध्यमातून उभारण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही पीएमआरडीए संविधान भवन उभारण्यासाठी सक्षम नसेल, तर सदर भूखंड पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करा. महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिल्या संविधान भवनाची पायाभरणी करु, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
विषेश म्हणजे, संविधान भवनाच्या उभारणीसाठी राज्याचा नगरविकास विभाग आणि मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अधिवेशनामध्ये लक्ष वेधणार आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवडकरांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या संविधान भवनाच्या निर्मितीला ‘बुस्टर’ मिळला आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महापालिका, पीएमआरडीए आणि महावितरण सह विविध विभागांतील प्रमुख प्रलंबित कामांसाठी महापालिका भवनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी महापालिका प्रभारी आयुक्त तथा पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
भाजपा आमदार महेश लांडगे यांनी २०१९ मध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे पाठपुरावा करुन संविधान भवन उभारणीकरिता आग्रह धरला होता. त्यानंतर महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली. या काळात संविधान भवनाचा विषय बाजुला पडला. तसेच, प्राधिकरणाचे विलिनीकरण पीएमआरडीएमध्ये करण्यात आले. ‘पीएमआरडीए’ पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री असतात.
दरम्यान, ‘पीएमआरडीए’ची अधिकार विभागणी, मनुष्यबळ नियुक्ती या बाबींमुळे संविधान भवनाबाबत सल्लागार नियुक्ती, प्रकल्प अहवाल याबाबत निर्णय झाला नाही. त्यावर राज्य सरकार व पीएमआरडीएने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पीएमआरडी आयुक्त राहुल महिवाल यांच्यासोबत आमदार महेश लांडगे यांनी बैठक घेतली. या बैठकीत सदर प्रकल्प पीएमआरडीएने करावा. त्यामध्ये पीएमआरडीएला काही तांत्रिक अडचणी असतील, तर सदर संविधान भवनासाठी आरक्षीत केलेला भूखंड पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करावा. त्या ठिकाणी महापालिका संविधान भवन उभारेल, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.












