न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२४) :- महापालिका हद्दीतील तळवडे परिसरात छोट्या-मोठ्या आस्थापनांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्या आस्थापनांमध्ये अग्निशमन प्रतिबंधक सुरक्षा साधनांचा अभाव आहे. त्यांना नोटीस देऊन अग्निरोधक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून अग्नी सुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र घेण्यात यावे, असे सांगून त्याकडे आस्थापना मालक दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे महापालिकेने तळवडेतील तब्बल २९ आस्थापनांचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात यावे, म्हणून अग्निशमन विभागाने विद्युत आणि पाणीपुरवठा विभागाला पत्र दिले आहे. त्यानुसार २९ आस्थापनांचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात छोट्या- मोठ्या आस्थापनांची संख्या मोठी आहे. त्या आस्थापनांमध्ये अग्निशमन प्रतिबंधक सुरक्षा साधनांचा अभाव आहे. शहरात काही आस्थापनांमध्ये ‘निचे दुकान, उपर मकान अशी स्थिती आहे. तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत १४ महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. एक महिला जखमी झाली. त्यानंतर सर्वेक्षण करण्याची तयारी महापालिकेने सुरु केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात व्यावसायिक व औद्योगिक आस्थापनांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची घोषणा केली होती.
तळवडे परिसरात ७२६ मिळकतीचा सव्र्व्हे करण्यात आला. त्यातील ६२२ आस्थापनांना प्रथम नोटीस देण्यात आली. त्यातील १२ आस्थापनाधारकांनी अग्नी सुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र घेण्यासाठी कागदपत्रे सादर केली. त्यानंतर ५३७ आस्थापनांना द्वितीय नोटीस देण्यात आली. त्यातून ३६ आस्थापना मालकांनी कागदपत्रे सादर केली. यामधील ३८ आस्थापनांना अग्नी सुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, अग्नी सुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र न घेणाऱ्याऱ्यांची संख्या मोठी आहे. पहिल्या टप्प्यात तळवडेतील ४ आस्थापना सील केल्या होत्या. त्यानंतर आता २९ आस्थापनांचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश महापालिकेच्या विद्युत व पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. त्यानुसार २९ आस्थापनांचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्यात येणार आहे.
पहिला टप्यात ४३ हजार ९३० व्यावसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण केले. त्यात १३ धोकादायक स्थितीत व्यवसाय करणाऱ्याा २ हजार ४२३ दुकानांच्या नोटीस तयार केलेल्या आहेत. त्यातील तळवडे भागातील ७९६ दुकानांच्या नोटीस वाटप सुरू केले. त्यानंतर ४ आस्थापना सील केल्या. आता २९ आस्थापनांचे वीज आणि पाणीपुरवठा कनेक्शन तोडण्यात येत आहे.
– मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग, महापालिका…












