- भाजपकडून विधानपरिषदेची अधिकृत उमेदवारी जाहीर..
- वंचित आणि दलितांना न्याय देण्याचे काम पक्षाने केले – अमित गोरखे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२४) :- भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. गोरखे निवडून आल्यास शहराला विधानसभेचे तीन आणि विधानपरिषदेचे दोन असे पाच आमदार मिळणार आहेत.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. उद्या २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आज गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
कोण आहेत अमित गोरखे?..
गोरखे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात ते वास्तव्यास आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व, एम.ए (सामाजिक शास्त्र), एमबीए (एचआर) पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आहे. नोव्हेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे काम आहे. अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासूनची नाळ आहे. न्यूज पेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य पदासाठीचे नॉमिनेशन असा त्यांचा प्रवास आहे.
भाजपने माझी विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी निवड केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाच्या नेत्यांचे आभार मानतो. वंचित आणि दलितांना न्याय देण्याचे काम पक्षाने केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात स्थापनेपासून आजतागायत कुठल्याही पक्षाने आमच्या समाजाला विधानपरिषद किंवा राज्यसभेची उमेदवारी देऊ केली नव्हती. ती भारतीय जनता पार्टीने दिली. येणाऱ्या काळात नक्कीच कानाकोपऱ्यात वंचित आणि दलित समाजासाठी येणारा निधी पोचविण्याचा प्रयत्न करेन. – मा. अमित गोरखे, पिंपरी विधानसभा प्रमुख भाजपा…