- लवकरच पक्षप्रवेश?; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळण्याच्या अवस्थेत?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२४) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवडमधील बालेकिल्ल्याला धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ माजी नगरसेवक पुण्यात खासदार शरद पवार यांना नुकतेच भेटले आहेत. लवकरच ते त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा आहे. माजी आमदार विलास लांडे हे देखील खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याची चर्चा रंगली आहे. युवक संघटनेतील काही पदाधिका-यांमध्येही चलबिचल सुरु झाली असून काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची सोमवारी मुंबईत भेट घेतली. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांसह संघटनेतील पदाधिकारीही पवार गटात जाण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसह खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त यश मिळाले. या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचा देखील समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार हे सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ माजी नगरसेवकांनी पुण्यातील मोदी बागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची चर्चा आहे. या भेटीत भोसरी विधानसभेबाबत चाचपणी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान आधी पक्षप्रवेश करा, विधानसभेचे नंतर बघू, असा सूचक इशारा शरद पवारांनी अजित पवार गटाच्या समर्थकांना दिल्याचे समजते. त्यामुळे शरद पवार गटात प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिसत नाही.
भोसरी विधानसभेत आगामी काळात महायुती एकत्र लढल्यास ही जागा भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना सुटण्याची दाट शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सोडला जातो. मात्र, आगामी काळात जागा वाटपात नेमकी काय चित्र असेल? हे नंतरच स्पष्ट होईल.
याबाबत आमच्या न्यूज पीसीएमसीच्या प्रतिनिधीने अधिकृत प्रतिक्रिया घेण्याकरिता दूरध्वनीवरून शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.