- युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव पुढाकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२४) :- आषाढी एकादशीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस सरसावली असून त्यांच्या वतीने या वारकऱ्यांची वारी आरोग्यदायी व्हावी यासाठी ‘मेडिकल किट’चे वाटप करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा उपक्रम दिघी येथे राबविण्यात आला. याप्रसंगी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गौरव चौधरी, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस वसीम शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या मेडिकल किटमध्ये ताप, अंगदुखी, पित्त, जुलाब आदी आजारासंबंधीच्या गोळ्या, वेदनाशामक जेल, झंडू बाम, बैंड ऐड, सर्जिकल कॉटन, रोलर बैंडेज, ORS या औषधांचा समावेश आहे. यावेळी सुमारे २०० वारकऱ्यांना या किटचे वाटप करण्यात आले.
यासंदर्भात बोलताना प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीतील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या या पंढरीच्या वारीची नाळ महाराष्ट्रातील प्रत्येक जाती-धर्माच्या भिंती ओलांडून फक्त माणसाशी जोडलेली आहे. या वारीत प्रत्येक जाती-धर्माचा माणूस अतिशय श्रद्धेने सहभागी होतो. तसेच प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या वारीसाठी आपली सेवा देण्याचे काम करतो. याच पार्श्वभूमीवर आम्हीदेखील या ‘मेडिकल किट’ वाटपाच्या माध्यमातून एक छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. या वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून आमची भक्ती विठ्ठलाच्या चरणी आम्ही अर्पण करीत आहोत.