- सदनिका भाड्याने देणे, विकणे असे प्रकार टाळा; पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२४) :- शहरात स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि घर म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, आज सोडतीमध्ये सदनिका मिळालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नवीन घरासाठी शुभेच्छा देत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी आर्थिक दुर्बल घटकातील घरकुल सदनिका लाभार्थ्यांनी योजनेचा उद्देश साध्य करण्यासाठी आपल्या घराचा वापर करावा. सदनिका भाड्याने देणे, विकणे असे प्रकार टाळावे, असे आवाहन लाभार्थ्यांना केले.
आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना शहरामध्ये आपल्या हक्काचे घर असावे यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र व राज्य सरकार यांच्या सहकार्याने चिखली येथील सेक्टर क्र.१७ व १९ मध्ये घरकुल प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातील डी -१० या इमारतीची आणि या इमारतीमधील ४२ सदनिकांची संगणकीय सोडत चिंचवड येथील आटो क्लस्टर येथे आज अतिरिक्त आयुक्त पाटील यांच्या हस्ते पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कोळप, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे, प्रशासन अधिकारी विष्णू भाट, मुख्य लिपिक सुनील माने, विशाल भोईर, लिपिक कुणाल डोळस, प्रकाश रोहकले, योगिता जाधव,संतोष बोत्रे, विनायक रजपूत यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, घरकुल योजनेतील लाभार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
जांभळे पाटील म्हणाले, ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना शहराच्या ठिकाणी भाड्याने राहावे लागते, तर काही लोकांना भाडे परवडत नसल्याने ते झोपडपट्टीत राहतात. अशा नागरिकांना शहरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे वाटते. तसेच शहरात आल्यावर आपला व आपल्या कुटुंबीयांचा जीवन जगण्याचा दर्जा उंचवावा अशी अपेक्षा असते, मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना स्वतःचे घर खरेदी करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल घटकातील सर्वसामान्य नागरिकांना परवडतील असे आपल्या हक्काचे घर देण्यासाठी महापालिकेने घरकुल योजने अंतर्गत सदनिकांची उभारणी केली आहे. या सदनिकांच्या सोडतीद्वारे ज्यांना घरे प्राप्त झाली आहेत त्यांनी आपल्या घरांचा वापर योग्य पद्दतीने करावा, दुस-यांना विक्री करू नये तसेच भाड्याने देऊ नये, असे त्यांनी सांगितले.
आर्थिक दुर्बलांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी महापालिकेने हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला. लाभार्थींनी आपले घर, इमारत तसेच सोसायटी परिसर स्वच्छ ठेवावे, आपल्या सभोवतालचे वातावरण शांत व पर्यावरणपूरक कसे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असे उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले.
सदनिकांच्या संगणकीय सोडतीनंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सदनिकांच्या सोडतीनंतर सोसायटीच्या नियोजित अध्यक्ष,सचिव आणि खजिनदार यांचा सन्मान केला. तसेच या सोडतीमध्ये सदनिका मिळालेल्या दिव्यांग लाभार्थी यांचा देखील सन्मान करण्यात आला.












