- बिल्डरकडून गुंडांच्या मदतीने नागरिकांमध्ये निर्माण केली जातेय दहशत..
- शहर भाजपचे सचिन काळभोर झुंडशाही विरोधात करणार ठिय्या आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२४) :- निगडीतील सेक्टर २२ येथील ‘एसआरए’ प्रकल्पाच्या नावाखाली बिल्डर व गुंडांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. बांधकाम व्यावसायिकांनी काही स्थानिक गुंडांना हाताशी धरून येथील नागरिकांच्या झोपड्या धाकदपटशा आणि पैशांच्या ताकदीवर संपादित करण्याचा रेटा लावला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व बिल्डर यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. या झुंडशाही विरोधात पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे चिटणीस सचिन काळभोर हे शनिवारी (दि. २०) रोजी निगडीतील अंकुश चौकात ठिय्या आंदोलन करणार आहेत. बिल्डर व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा निषेध करणार आहेत.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “गेल्या कित्येक वर्षांपासून निगडीतील सेक्टर २२ मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा विषय प्रलंबित होता. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी मार्च महिन्यात परिसराचे सर्वेक्षण केले होते. येथील आझाद चौक झोपडपट्टी, श्रमिकनगर, संग्रामनगर, दळवीनगर या भागाचा त्यात समावेश होता. नागरिकांना एसआरए प्रकल्पांतर्गत इमारत उभारणी करून ‘पॉश’ आणि मोठ्या आकाराच्या सदनिका देण्याचे आमिष प्रारंभी बिल्डरने दाखविले होते. त्यामुळे नागरिकांनी स्वखुशीने आपल्या झोपड्या प्रशासनाच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता केवळ तीनशे स्क्वे. फुटाच्या सदनिका येथील लाभार्थ्यांच्या माथी मारण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे येथील नागरिक संभ्रमात सापडले आहेत. तर, दुसरीकडे एसआरए प्रकल्पासाठी गुंडांच्या माध्यमातून येथील लाभार्थ्यांना धमकावले जात आहे.
संमतीपत्रावर त्यांच्या बळजबरीने सह्या घेण्याचा उद्योग अनधिकृतपणे सुरु आहे. याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांशी चर्चा केली नाही. त्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याशिवाय या प्रकल्पात पन्नास झोपडपट्ट्या बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, असे या पत्रकात काळभोर यांनी म्हटले आहे.














