- हिंजवडीत अनधिकृत पब, बार, रेस्टॉरंटवर बुलडोझर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून मागील दोन महिन्यांत तिसऱ्यांदा हिंजवडी आयटी पार्कमधील पाच अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंटवर बुलडोझर चालवून निष्कासन कारवाई करण्यात आली. तर माण मध्ये चार अनधिकृत होर्डिंग्ज गॅस कटरने जमीनदोस्त करण्यात आले.
सोमवारी (दि. १५) सकाळी साडेनऊ वाजता सुरू करण्यात आलेली कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये देजा बू बिस्ट्रो, द ३ मस्कीटर्स, ब्लू ग्रास बार अँड बँक्ट, हॉटेल लक्ष्मी बार, बर्ड व्हॅली बार रेस्टॉरंट असे ०५ अनधिकृत हॉटेल, पब बार अँड रेस्टोवर कारवाई करण्यात आल्याचे अनधिकृत बांधकाम विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे यांनी सांगितले. साधारणपणे २३४१७.०० चौ. फूट. क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
निष्कासन कारवाई करतेवेळी जेसीबी पोकलेन, क्रेन, अग्निशामक दलाच्या गाड्या, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे अधिकारी कर्मचारी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्थानिक हिंजवडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान आकाश चिन्ह कारवाई विभागाने तहसीलदार सचिन म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासनाचा १५ ते ३१ जुलै पर्यंतचा नियोजन आराखडा तयार केला असून सोमवारी माण ता मुळशी येथील ४ अनधिकृत होर्डिज मुईसपाट केले. ज्यांनी प्राधिकरणाकडे परवानगीसाठी अर्ज केले नाही अशा होर्डिंग्ज वर कारवाई करण्यात आली. प्राधिकरणाचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आढावा बैठकित दिलेल्या सूचनेनुसार प्राधिकरण हद्दीतील उर्वरित सर्व पब, बार व रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून या सर्व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई यापुढेही चालू राहील, असेही उपजिल्हाधिकारी दोंडे यांनी सांगितले.
हिंजवडीतील एका हॉटेलचे बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड मधील एका बड्या नेत्याने आपल्या नातलगांसाठी विरोध केला, मात्र राजकीय हस्तक्षेप झुगारून कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेक हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत.


















