- अजित पवार गटाला भगदाड पडणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२४) :- पिंपरी- चिंचवड शहरामध्ये शरद पवार यांची २० जुलैला भव्य सभा होणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे.
पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात या सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. वॉटरप्रूफ मंडप टाकला जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील अजित पवारांची ताकद शरद पवार गट कमी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अजित पवार गटाचे माजी नगरसेवक यांच्यासह अजित पवारांच्या जवळचे स्थानिक नेते यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे घटनेला पुष्टी मिळत आहे. २० जुलै रोजी भव्य सभा पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात होणार आहे. याच सभेत अजित पवार गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला. असे काही घडणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिला आहे. त्यामुळे २० जुलैला नक्की काय घडणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.














